पुण्यात टोळीयुद्धाचा पुन्हा भडका; आजोबानेच नातवाचा खून घडवून आणल्याचा पोलिसांचा दावा
आयुष कोम्वकरचे वडील गणेश कोमकर हे तुरुंगात होते. अखेर, त्यांना मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी पॅरोलवर बाहेर आणण्यात आलेby: सुदाम पेंढारे

पुणे (९ सप्टेंबर २०२५) - शहरात पुन्हा एकदा टोळीयुद्धाचे लोण पसरले असून, नाना पेठेत शुक्रवारी (५ सप्टेंबर) १८ वर्षीय आयुष कोमकर याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ही हत्या आयुषचे आजोबा आणि कुख्यात गुंड सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर यांनीच घडवून आणल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. ही घटना गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
नेमके काय घडले?
गणेश विसर्जन सुरू असतानाच शुक्रवारी रात्री नाना पेठेतील श्री लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये आयुष कोमकरवर गोळ्या झाडण्यात आल्या. हल्लेखोरांनी त्याच्यावर ९ गोळ्या झाडल्या, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर हल्लेखोरांनी "इथे फक्त बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकर" अशा घोषणा दिल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आयुष हा वनराज आंदेकरचा भाचा होता आणि त्याचे वडील गणेश कोमकर हे वनराजच्या हत्येतील मुख्य आरोपींपैकी एक आहेत.
खून कौटुंबिक वादातूनच
वनराज आंदेकरची गेल्या वर्षी १ सप्टेंबर रोजी हत्या झाली होती. या हत्येमागे मालमत्तेचा वाद आणि टोळीयुद्धाची पार्श्वभूमी असल्याचे समोर आले होते. वनराजची बहीण संजीवनी कोमकर आणि तिचा पती गणेश कोमकर हे वनराजच्या हत्येतील आरोपी आहेत. गणेश सध्या नागपूरच्या कारागृहात आहे. आपल्या मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी बंडू आंदेकर यांनी हा कट रचल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपींना अटक, आजोबांसह ६ जण पोलिसांच्या ताब्यात
या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत आतापर्यंत एकूण आठ आरोपींना अटक केली आहे. त्यात मुख्य आरोपी बंडू आंदेकर आणि इतर सहा जणांना राज्याबाहेरून, तर दोन आरोपींना पुण्यामधून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अंत्यसंस्कारासाठी वडिलांना पॅरोल
आयुषचा मृतदेह शवविच्छेदनानंतर तीन दिवस ससून रुग्णालयातच ठेवण्यात आला होता, कारण त्याचे वडील गणेश कोमकर हे तुरुंगात होते. अखेर, त्यांना मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी पॅरोलवर बाहेर आणण्यात आले. सोमवारी रात्री उशिरा आयुषवर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या घटनेमुळे शहरात पुन्हा एकदा टोळीयुद्धाची चर्चा सुरू झाली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.